आशा पल्लवीत करणारी पल्लवी

आमच्या करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी आल्या की मन भरुन येते. मी राजकीय सन्यास घेतला होता, काही व्यवसाय बंद होते तर काही बंद पडण्याच्या वाटेवर होते. खुपच कमी वयात मिळालेले चटक्यांमुळे मी अकाली वृध्द झालो होतो. माझी ही अवस्था माझ्या शरीरावर देखील दिसत होती तसेच माझ्या स्वभावात देखील कमालीचा पोक्तपणा आला होता. अनुभवांनी माणुस शहाणा होतो व अपयशांनी समृध्द होतो असे म्हणतात खरे पण ते प्रत्येकाच्या बाबतीत लागु होते असे नाही. मला मात्र या संघर्षातुन काहीतरी शिकण्यासाठी खुप वेळ लागत होता, किंबहुना मी यातुन बाहेर कसा पडणार ही वेगळी चिंता मला आतुन पोखरत होती.

त्या पडत्या काळात देखील मला कधीतरी पल्लवीविषयी काळजी वाटायचीच. ती शिकलेली होती. हसत खेळत राहणारी अल्लड अशी पल्लवी माझ्या सारख्या अकाली वृध्द माणसासोबत कशी काय निभावणार, त्यातच आम्हाला राजकीय पार्श्वभुमी!

घरी सदैव लोकांचा जमावडा, गावकी, भावकी , नातेवाईक, लग्ने समारंभ, थाट-माट हे सगळे ती करीत होती. मला कधी कधी वाटायचे की पल्लवी अनिच्छेने तर नाही ना हे सर्व करीत? मला तिची काळजी वाटायची.

पल्लवी एका सुसंस्कृत कुटुंबातुन आलेली. आई-वडील सुशिक्षित आणि समाजामध्ये प्रतिष्ठा असलेले होते. आपल्या मुलांनी नव्या प्रवाहासोबत राहिले पाहिजे, चांगले शिक्षण घेतले पाहिजे असे त्यांना नेहमीच वाटायचे. त्यामुळेच पल्लवीला कधीही शिक्षणाच्या बाबतीत अडसर घरातुन आला नाही. उलट घरातुन नेहमी प्रोत्साहनच मिळत गेले.

एका  घरगुती कार्यक्रमाप्रसंगी पल्लवी

पल्लवी तिच्या मित्र-मैत्रिणींमध्ये सर्वात जास्त बोल्ड, धाडसी मुलगी! तिच्या जवळच्या सर्वांनाच वाटायचे की पल्लवी आयुष्यात नक्की काहीतरी वेगळे करील. खुप शिकेल, खुप चांगली मोठी नोकरी करेल, नोकरीत प्रगती करील. आणि पल्लवीला देखील असेच ‘गट फिलींग’ होतेच.

पण आमच्या लग्नानंतर तिच्या जीवनात एकदम यु टर्नच यावा की काय असे काहीसे झाले होते. खेळकर पल्लवीला सासरी वावरताना मान-सन्मान इ ची काळजी घ्यावी लागायची. आमच्या कडे दररोज किमान शंभरेक लोकं तरी येत जात असायची. चुलते सहकारात खुपच मोठ्या हुद्यावर होते, त्यांची राजकीय कारकिर्द गाजलेली आणि लोकप्रिय देखील. त्यांचे बोट धरुन मी देखील राजकारण-समाजकारण इ मध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आमचे उठण्या-बसण्या मध्ये एक थाट होता. मला आता उमगत आहे की तो थाट तसा टिकवुन ठेवणे, दाखवणे हे प्रत्येक राजकारणी माणसाला करावेच लागते. व त्या कार्यकर्त्याच्या, नेत्याच्या कुटुंबाला देखील मग त्या थाट-माटाचे इच्छेने अथवा अनिच्छेने वाटेकरी व्हावेच लागते.

आमच्या हडपसर येथील फिटनेस स्टुडीयो च्या उदघाटन प्रसंगी

आमचे लग्न झाल्यानंतर पल्लवीला चुलत्यांनी सांगितले की तु आणि महेश शहरत रहायला जा. तुला गावाकडची सवय नाहीये आणि शहरात गेल्याने तुला एम सी एम देखील पुर्ण करता येईल. तुला नोकरी करायची असेल तर तसेही तु करु शकते. यावर पल्लवी ने चक्का नकार दिला होता. मग तिला गावाहुन कॉलेजला जाण्यायेण्याची सोय करुन देण्यासाठी विचारले तरीही ती नको असेच म्हणाली.

पल्लवीने स्वतःला आमच्या कुटूंबाच्या रंगात रंगवुन घ्यायचे ठरविले होते. दुधात साखर मिसळावी व दुधाची गोडी वाढावी अगदी तसेच पल्लवीने आमच्या घरा-दाराला आपलेसे केले. पल्लवी सासरी देखील सर्वांची लाडकी झाली. पल्लवीने असे गावाला राहणे अनिच्छेने स्वीकारलेले नव्हते. तिने मनापासुन, स्वेच्छेने हे स्वीकारले. व हे सर्व करताना तिला आनंद होत होता. ती सुखी होती. अर्थत तिचा नवरा म्हणुन मी हे बोलतोय असे नाही तर आम्ही चांगले मित्र देखील आहोतच त्यामुळे तिच्या मनातील न बोललेल्या भावना देखील मला समजतात असा माझा विश्वास आहे.

माझी राजकीय कारकिर्द सुरु होती तशीच आमच्या संसाराची गाडी देखील पुढे सरकत होती. आम्ही दोघे आता केवळ नवरा बायको राहिलो नाही. अन्वित च्या रुपाने आमच्या संसाराच्या झाडाला एक फळ आले. आम्ही आई-बाबा झालो.

अन्वित च्या शिक्षणासाठी नाइलाजानेच आम्हाला शहरात राहण्यास यावे लागले. याच काळात मी शारीरीक, मानसिक व भावनिक दृष्ट्या खचलो होतो. अपयश पचवणे मला थोडे कठिण जात होते. नवी उभारी घेण्यासाठी शक्ति संचय करणे, नवी रणनीती आखणे, स्वतःचा शोध घेणे, अभ्यास करणे, चिंतन करणे असे सगळे माझे सुरुच होते. आणि पल्लवी सावलीसारखी माझ्या सोबत होती.

या धामधुमीत माझे वजन भयंकर वाढले. मला अनेक व्याधी जडु लागल्या. थकवा , अनिद्रा, ताण-तणाव, शरीर ढब होणे अशा अनेक समस्यांनी मी ग्रासलो जात होतो. मला वजन कमी करणे खुपच गरजेचे झाले होते. मला माझा मेंटॉर मिळाला. मार्गदर्शक मिळाला. आणि मी वजन कमी करण्याचा प्रवास सुरु केला. मी तीनच महिन्यात चक्क १८ किलो वजन कमी केले. पल्लवी या सगळ्याची साक्षीदार आहे. पल्लवीने मला वेळोवेळी प्रोत्साहनच दिले. माझ्या मेंटॉर कडे पाहुन मला देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडली. कारण जो बदल माझ्यात झाला तो कसल्याही राजकिय भाषणाने झाला नसता. कसल्याही निवडणूकीने झाला नसता. माझ्यातील बदल शरीर, मन,व बुद्धी या तिन्ही मधील सकारात्मक बदल होता. माझ्यात झालेला आंतर्बाह्य बदल पल्लवीने देखील अनुभवला, ओळखला.

लग्नानंतर सासरच्या दिमाखाला तिने आणखी जास्त सुंदर करणा-या पल्लवीने आमच्या व्यवसायाला देखील हसतखेळत ताजेतवने ठेवले. आमच्या आयुष्यातील चढउतार आम्ही एकमेकांच्या साथीने पाहिले. त्यातल्यात पल्लवीची साथ माझ्या साठी खुपच मोलाची ठरली.

Empowered woman

आमच्या व्यवसायाची सुरुवात खरतर पल्लवीसाठी काहीतरी उद्योग म्हणुन झाली. मी या व्यवसायात एवढा गंभीर नव्हतोच कधी. पल्लवीला एक संधी मिळाली आणि तिने त्या संधीचे सोने केले. तिच्या पावलावर पाऊल ठेवुन मी देखील तिच्या सोबतच काम करायचे ठरवले. माझ्यावर जो प्रभाव माझ्या मेंटोरचा होता तो देखील मला या व्यवसायाकडे घेऊन आला. शुन्यातुन सुरु केलेला आमचा व्यवसाय आज एका वेगळ्याच ऊंचीवर तिने नेऊन ठेवलाय.

एका कॉन्सफरंस दरम्यान मी व पल्लवी

ती ट्रेनिंग्स कंडक्ट करते. ती काऊंसेलिंग छान करते. ती फॉलोअप छान करते. ती एक चांगली टीम प्लेयर आहे. ती एक खुप चांगली मोटीव्हेटर आहे. प्रसंगी मला किंवा आमच्या ऑरगनायझेन मधील कुणाला आधाराची गरज असेल तर पल्लवी तातडीने हजर असते. आज तिच्यासारख्याच ५० पेक्षा जास्त स्त्रियांची ती प्रेरणा आहे.

आमच्या व्यवसायातील बारकावे पल्लवीने चटकन शिकुन घेतले. तिचा हसरा चेहरा आणि ग्राहकांशी आपुलकीने वागणे हे सर्वात महत्वाचे होते, आहे. आमच्या ग्राहकाचे ध्येय तेच आमचे ध्येय. ग्राहक यशस्वी तर आम्ही यशस्वी. ग्राहक खुष तर आम्हे खुष! असे महान तत्वज्ञान पल्लवीने हसतखेळत व्यवसायात उतरवले.

स्व्तःच्या अनुभवातुन इतरांना प्रेरणा देणारी पल्लवी

स्त्री मग ती शिकलेली असो अथवा अडाणी, तिच्या मध्ये प्रचंड ऊर्जा असते. स्त्री ऊर्जेचा अखंड स्त्रोतच आहे. खळाळत वाहणारी नदी जशी असते अगदी तशीच स्त्री देखील आहे. स्त्रीच्या अंतरी असलेली ही ताकत पल्लवीने ओळखली. पल्लवी lead by example या तत्वावर विश्वास ठेवते. तिच्या (म्हणजे आमच्याच) टीममध्ये महिला पुरुष १०० पेक्षा जास्त आहेत. सर्वांना मार्गदर्शन करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, सर्वांशी चांगली मैत्री करणे, त्यांच्या अडी अडचणी समजुन घेऊन, त्या अडी अडचणी त्यांनी स्वःतच सोडवण्यासाठी त्यांना प्रेरीत करणे अशी अनेक off the record कामे तिच्याकडुन सहज होत असतात. अनेकांंना उभारी देत सकारात्मकतेच्या आशा पल्लवीत करणारी पल्लवी!

पल्लवीकडुन सर्वांनाच अजुन खुप शिकायचे आहे. तिच्यासोबत आम्हाला सर्वांनाच यशाच्या नवनवीन शिखरांना पादाक्रांत करायचे आहे. तिचा हा प्रवास असाच अविरत सुरु राहो अशी सदिच्छा!

 

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *