आर्थिक स्थैर्य कसे मिळवावे

काही वर्षापुर्वी टिव्ही वर एका मालिकेमध्ये एक सामान्य मनुष्य करोडपती झाल्याचे आपण पाहिले असेलच. या मालिकेमध्ये अनेकांना बक्षीसे मिळाली आहेत पण ते सगळे विजेते लक्षात नाही राहिले पण ही व्यक्ति विशेष लक्षात राहिली. याचे कारण असे होते की हा माणुस अगदी सामान्य, निम्न मध्यमवर्गीय कुटूंबातुन आलेला होता व एवढी मोठी रक्कम तो जिंकेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. तो खुप आनंदी झाला होता. त्याने पाच करोड रुपये जिंकले होते. त्याचे नाव सुशील कुमार. हा बिहारचा एक तरुण होता.

सुशील कुमार सध्या काय करीत असेल बरे? कदाचित खुप मोठा बंगला असेल, एखादा मोठा व्यवसाय असेल त्याचा. भरपुर प्रॉपर्टी बनवुन ठेवली असेल त्याने आतापर्यंत त्याने! बरोबर ना?

पण असे काहीच झाले नाही. पाच करोड रुपये या कार्यक्रमात जिंकणे सोपे काम नव्हते. आय ए एस आय पी एस सारख्या परिक्षांना विचारतात तसे प्रश्न विचारतात या शो मध्ये. याचाच अर्थ सुशील कुमार बुध्दीमान असल्यानेच त्याने सगळ्या लेव्ह्ल्स जिंकल्या. एवढा हुशार असेल तर मग कदाचित सुशील कुमार ने पाच करोड रुपयांच्या मदतीने स्वतःचे एक उद्योग साम्राज्यच निर्माण केले असेल आतापर्यंत. असे आपणास वाटणे साहजिक आहे.

पण तसे काही झाले नाही. सध्या सुशील कुमार एका कारखान्यात नोकरी करतो व ते ही एक हंगामी कामगार म्हणुन. एवढा हुशार व्यक्ति आणि एवढी मोठी रक्कम हातात असताना देखील सुशील कुमारची अवस्था अशी कशी काय झाली असेल बरे?

आपल्याकडे एकटा सुशील कुमारच नाहीये बर का करोडपती ते थेट रोडपती झालेल्यांमध्ये! शेकडो, हजारो उदाहरणे तुम्हाला तुमच्या आजुबाजुला देखील दिसतील. या सर्वांवर अशी वेळ यायचे कारण काय असेल?

याचे कारण आहे आर्थिक निरक्षरता!

होय. मागील लेखामध्ये आपण या विषयी चर्चा केली आहेच.

आर्थिक साक्षरतेसाठी मी दोन लेख लिहिणार आहे. पहिला म्हणजे आजच्या लेखामध्ये मी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी काय करता येईल यावर लिहिणार आहे व दुस-या भागामध्ये आपण आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवायचे हे पाहायचे आहे.

आर्थिक स्थैर्य म्हणजे नेमके काय?

आपल्याकडे उत्पन्न व खर्चाच्या दोन बाजु असतात.

  • नोकरी व्यवसायातुन येणारे उत्पन्न
  • नेहमीचे, टाळता येणार नाहीत असे खर्च

सामान्य लोकांच्या बाबतीत हे दोन्ही घटक स्थिर असु शकतात. पण ज्या लोकांना नेहमीच आर्थिक विवंचना असते अशांच्या बाबतीत उत्पन्न हे नेहमीच्या खर्चापेक्षा कमी असते.  अशा लोकांना मी आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणतो. माझा हा लेख आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणा-या लोकांसाठे नाहीये. ज्यांचे उत्पन्न व खर्च हे समसमान किंवा थोडे मागे-पुढे असते त्यांसाठी हा लेख आहे. व पुढील लेख म्हणजे ‘आर्थिक स्वातंत्र्य’ हा लेख अशा सर्वांसाठीच असणार आहे की ज्यांना स्थैर्याकडुन आर्थिक स्वातंत्र्याकडे जायचे आहे.

महिन्याच्या शेवटी उत्पन्न व खर्चाची टॅली होणे म्हणजे आर्थिक स्थैर्य नाही. टॅली होत असेल तर कदाचित तुम्ही आर्थिक स्थिरतेकडे पावले टाकण्यास पात्र ठरु शकता.

पैसे कमाविण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. पण आपण पैसे खर्च कसे करतो यावर ठरते आपण आर्थिक दुर्बल म्हणजेच गरीब आहोत की स्थिर आहोत की स्वतंत्र आहोत.

उत्पन्न आणि खर्चाची टॅली होणे म्हणजे गरीबी. म्हणजेच काय तर जेवढे येतात तेवढे सगळे सगळेच्या नेहमीचे टाळता न येण्यासारखे खर्चांमध्ये (अन्न, घरभाडे, दवाखाना, विविध बीले, इत्यादी) संपुन जातात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांकडे आपल्या उत्पन्नापैकी एक ही पैसा इतत्र खर्च करण्यासाठी नसतो.

मग तुम्ही म्हणाल की काय करायचाय जास्त पैसा? सगळे भागते आहे ना व्यवस्थित मग कशाला हवाय जास्त पैसा?

समजा तुम्ही किंवा तुमच्या घरातील कुणी अचानक जीवघेण्या अपघातात सापडले व हॉस्पिटल साठी ५-१० लाखांची गरज निर्माण झाली तर? तर काय करणार? फेसबुक, व्हॉट्सॲपवर मदतीसाठी मेसेज फॉरवर्ड करत बसणार का? कदाचित तुम्ही करातील करते व्यक्ति आहात म्हणजे कमावते आहात व तुम्हालाच दुर्दैवाने काही बरे वाईट झाले तर काय करणार तुमचे कुटूंब तुमच्या मागे?

अशा वेळी कामास येतो त्याला म्हणतात आपातकालीन, राखीव राशी. जर तुमच्या कडे अशी आपात्कालीन राशी की जी तुमच्या कमाईतुन नित्यनेमाने वेगळी साठवलेली आहे तरच म्हणता येईल की तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्थिर आहात. मला वाटते आर्थिक स्थिरता म्हणजे नेमके काय हे तुम्हाला आता समजले असेल.

चला तर मग, आज तुम्हाला मी काही युक्त्या सांगतो ज्यांचा उपयोग करुन तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्थिर होऊ शकता. यातील सर्व टिप्स कृतीत उतरवता येण्यासारख्या आहेत हे ध्यानात ठेवुन पुढे वाचा.

  • तात्काळ खर्च करा. तुम्ही म्हणाल तात्काळ खर्च केल्याने आर्थिक स्थैर्य कसे काय येईल बरे? मी सांगतो. आपणाकडे एक प्रघात आहे, तो म्हणजे आजचा खर्च उद्यावर ढकलणे. असे केल्याने आपण भविष्यासाठी संकटांना जन्म देत असतो. त्यामुळे आजचा खर्च आजच करणे गरजेचे आहे. या खर्चामध्ये विविध बिले भरणे असेल, भाडे देणे असे, फी भरणे असेल किंवा तुमचा कोणताही मंथली खर्च असेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर असे की “उधार घेऊन किंवा ठेवुन वस्तु सेवा घेऊ नये”. महिन्याच्या सुरुवातीस पगार हाती आला तर पहिले काम खर्च करणे हेच असले पाहिजे. आणि हे खर्च तुमच्या टाळता न येण्यासारख्या गोष्टींवरच झाले पाहिजे.
  • अनावश्यक म्हणजे इंपल्स खरेदी/खर्च टाळणे – कित्येकदा आपण एखाद्या मॉल मध्ये अचानक समोर दिसलेली एखादी वस्तु घेण्याचा निर्णय, तो ही अचानक घेतो. आपल्या महिन्याच्या बजेट मध्ये अशा खरेदीला स्थान नसताना देखील आपण भावनेच्या भरात खर्च करुन बसतो. यालाच म्हणतात इंपल्स खर्च किंवा मोहीत होऊन केलेला खर्च. यामध्ये हॉटेलमध्ये जेवणे असेल, महागडे मोबाईल, कॅमेरे घेणे असेल, किंवा सुट्टीसाठी एखादे महागडे हॉटेल निवडणे असेल. स्वतःस या इंपल्स खर्चाच्या संभाव्य धोक्याविषयी पुर्वसुचना देऊन ठेवा म्हणजे असा मोह आवरणे सोपे होईल.
  • आपण केलेल्या खर्चाच्या नोंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने महिन्याच्या शेवटी तुम्ही मागोवा घेऊ शकता व जिथे जिथे अनावश्यक खर्च केले असतील, झाले असतील ते ते पुढील महिन्यामध्ये टाळु शकता.
  • वर म्हंटल्याप्रमाणे आपल्या उत्पन्नाच्या किमान ५% रक्कम दरमहा, आपात्कालिन फंडात म्हणजे एखाद्या दुस-या बचत खात्यात किंवा सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान मध्ये टाका. हा फंड म्हणजे ही राशी, तुमच्या साठी आता नेहमीचा, टाळता न येण्यासारखाच खर्च आहे असा पक्का विश्वास करुन, समज करुन दरमहा पैसे वेगळे काढा. लक्षात असु द्या, ही बचत नाहीये. हा आहे आपात्कालिन फंड!
  • कर्जे टाळा – आपले उत्पन्न पाहुनच गरजेच्या नसणा-या व हौशेच्या गोष्टींवर खर्च करा. ब-याचदा आपण अशा गोष्टी केवळ समाजातील प्रतिष्टेपायीच घेत असतो. सर्वांनी कार घेतल्या, मी देखील घेतली पाहिजे. अस विचार जर तुम्ही कधी केला असेल किंवा करीत असाल तर यातुन दोन गोष्टी अधोरेखित होतात. पहिली म्हणजे तुम्ही आर्थिक गरीब आहात व दुसरी म्हणजे तुम्ही वैचारीक दृष्ट्या देखील गरीबच आहात. मोटर गाडीची गरज असेल तर कर्ज काढुन घेणे वेगळी गोष्ट आहे. सोबतच क्रेडीट कार्ड्स बाळगण्याचा मोह देखील टाळा. जर चुकुन तुम्हावर कसले कर्ज, उधा-या असतील तर आधी ते कमी करण्यावर, संपवण्यावर भर दिला पाहिजे.

या पाच गोष्टींच्या पालनाने तुम्ही १०१% आर्थिक दृष्ट्या स्थिर होणार हे पक्के समजा. हा माझा अनुभव देखील आहे आणि निरीक्षण देखील आहे.

वरील सर्व गोष्टी अश्या लोकांसाठी आहेत ज्यांना अशी पक्की खात्री आहे की त्यांचे उत्पन्न कधीच वाढणार नाही. उत्पन्न जरी वाढले नाही तरी वरील मी दिलेल्या सल्ल्यानुसार जर खर्च केले गेले तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्थिर व्हाल हे नक्की.

पण काय फक्त आर्थिक दृष्ट्या स्थिर होणे, हेच आपले लक्ष म्हणजे ध्येय असले पाहिजे का?

काय असले पाहिजे आपले आर्थिक ध्येय व ते कसे गाठायचे? या सर्व बाबतीत सविस्तर माहितीसाठी अवश्य वाचा माझा पुढचा लेख.

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

आशा आहे तुम्हाला माझे हे लेख आवडतील. हे लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेयर करा. काही शंका, प्रश्न असतील तर बिनधास्त विचारा!

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *