श्रीमंतीचा महामार्ग – भाग ५

मनुष्य सवयींचा गुलाम आहे; ही म्हण उगाचच आपल्याकडे रुढ झालेली नाही. ब-याचदा अशा यक्ति की ज्या वाईट सवयींमुळे ओळखल्या जातात त्यांच्या बाबतीत ही म्हण बोलली ऐकली जाते.

माझ्या या लेखमालेमध्ये देखील मी सवयींविषयीच जास्त बोलत आहे. आणि मी मात्र सवयींचाच उपयोग यशस्वी लोक करतात व यशस्वी होतानाच ते श्रीमंत देखील होतात यावर भर दिलेला आहे. सवयी माणसाचे चरित्र घडवतात. सवयी जशा तुम्हाला रसातळाला घेऊन जाऊ शकतात तशाच सवयी तुम्हाला यशाच्या सवोच्च शिखरावर देखील घेऊन जाऊ शकतात. व या दोन्ही टोकाच्या घटना घडताना आपणास अगदी दररोज दिसत असते. पण आपणच कधी जाणिवपुर्वक अशा घटनांकडे डोळे उघडुन पाहत नाही. दिसणे आणि पाहणे यात खुप फरक आहे. दिसणे ही नैसर्गिक क्रिया आहे तर पाहणे आपणास जाणिवपुर्वक करावे लागते.

इथुन पुढे आपण अशा सवयींविषयी बोलणार आहोत की ज्या एखाद्या माणसाला जडल्या की त्या मनुष्याचा उत्कर्ष हमखास होतोच. या सवयींविषयी खोलात जाऊन जाणुन घेण्या अगोदर आपण काही मुलभुत गोष्टी पाहुयात.

अगदी मागील २०-३० वर्षांपासुन भारतामध्ये एक नवीन विचार रुढ झालेला दिसतो. याला आपल्याकडे (आणि सगळ्या जगातच) व्यक्तिमत्व विकास असे नाव दिले आहे. तुम्ही कधी एखाद्या व्यक्तिमत्व विकासाच्या प्रशिक्षणामध्ये भाग घेतला आहे का? जर तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला आठवत असेल की व्यक्तिमत्व विकासामध्ये सगळा भर तुम्ही कसे दिसावे, कसे बोलावे यावर दिलेला असतो. व्यावसयिक इटीकेट म्हणजे कॉर्पोरेट रीलेशन मध्ये आपला व्यवहार कसा असायला हवा यावर या प्रशिक्षणाचा भर असतो. यामध्ये सॉफ्ट स्किल्स, इंग्रजी भाषा, प्रेझेंटेशन स्किल्स, निगोशियेशन स्किल्स, इमेल रायटींग स्किल्स, कॉर्पोरेट ड्रेसिंग सेन्स अशा बहुत गोष्टींचा समावेश आहे.

हे सगळे खुप चांगले आहे. पण तुम्हाला यामध्ये एक कमतरता दिसते आहे का? या सर्वांमध्ये प्रामुख्याने आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना एकाच मापात मोजुन सर्वांना एकाच प्रकारचे शिक्षण दिले जाते. मग तो व्यक्ति कसाही असो. मागे एकदा मी एक प्रश्न माझ्या फेसबुक वॉल वर विचारला होता. चांगले दिसणे महत्वाचे आहे की चांगले असणे महत्वाचे आहे?  यावर अनेकांनी चांगले असणे जास्त महत्वाचे आहे असेच सांगितले. अगदी बरोबरच आहे हे. पण प्रश्न असा आहे की चांगले असणे म्हणजे नक्की काय व एखाद्याने अपेक्षित चांगले होण्यासाठी शिक्षण प्रशिक्षणाची काही सोय आपल्याकडे उपलब्ध आहे का? असो.

तर मुद्दा असा आहे की मनुष्य अंतर्मनाने कसाही असला तरी व्यक्तिमत्व प्रशिक्षणाच्या भट्टीतुन गेला की तो कॉर्पोरेट रेडी होतो. या सर्वांमध्ये एक गोष्ट की मानवी जीवनाचा कणा आहे, ती गोष्टच आपण हरवुन बसलो आहोत. ती गोष्ट आहे मुल्यांवर आधारीत चरित्रनिर्माण. जीवन-मुल्ये की जी चिरंतन आहेत व जी कोणत्याही स्थानी अथवा कोणत्याही काळात लागु पडतात अशा जीवनतत्वांना आपण हरवुन बसलो आहोत. त्यामुळे हल्लीचे व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण मनुष्याची तात्पुरती डागडुजी करुन त्यांना व्यावसायिक स्पर्धेमध्ये पळण्यासाठी सोडुन देतात. या तात्पुरत्या डागडुजीचे परिणामदेखील तात्पुरतेच असतात. म्हणजे या सर्व स्किल्स म्हणजे कौशल्यांचा उपयोग फक्त आणि फक्त तात्पुरते म्हणजे अल्पकालिन ध्येय उद्दीष्ट गाठण्यासाठीच होतो. ही तात्पुरती मलमपट्टी अगदी थोड्या वेळासाठी माणसाला मदत करतेच यात शंका नाहीच. पण यामुळे मुळ आजारावर कायमस्वरुपी उपचार अजिबात होत नाही. हा आजार काय आहे बरे?

हा आजार म्हणजे आपण मनुष्य आहोत याचा विसर पडणे. इथुन पुढे मी या लेखमालेमध्ये ज्या काही सवयींविषयी बोलणार आहे त्या सवयी काही नवीन गोष्टी नाहीयेत. त्या सवयी मी फक्त व्यवस्थित पणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या सवयींच्या बाबतीतील एक गोष्ट मी तुम्हाला इथे स्पष्ट करु इच्छितो ती अशी या सवयी म्हणजे तात्पुरती डागडुजी अजिबात नाहीये. या सवयी किंवा कौशल्ये जी मी तुम्हाला इथुन पुढे सांगणार आहे त्यामुळे जांदुची कांडी फिरवावी तसा काहीही चमत्कार होणार नाही आपल्या आयुष्यामध्ये. विकास म्हणजेच मंगल विकास ही सतत, चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे. या सवयी वैश्विक आहेतच सोबत त्या त्रिकाल-अबाधित देखील आहेत. यांना उपयोगाच्या आहेत की नाही अशी शंका घेण्याचे काहीच कारण नाही कारण त्या स्वयं-सिध्द देखील आहेत.

वैश्विक याचा अर्थ असा की तुम्ही जगाच्या कुठेही वास्तव्यास असा, या सवयी जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला यांचे चांगले परिणाम तुमच्या जीवनामध्ये अनुभवास येतीलच. त्रिकाल-अबाधित याचा अर्थ असा की, या सवयी मनुष्याच्या सर्वांगिण विकासासाठी हजार वर्षापुर्वी जितक्या उपयोगाच्या होत्या तितक्याच वर्तमानात देखील आहेत व हजारो, लाखो वर्षांनंतर देखील त्या तितक्याच उपयोगाच्या आहेत.

आपला जो आजार आहे त्या आजारावर, या सवयी म्हणजे रामबाण इलाज आहे. रामबाण शब्दाचा अर्थ व महती तुम्हाला माहित असेलच. हा इलाज नुसता आजारावरच नाही तर ही आहेत मार्गदर्शक तत्वे की तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जातील. आणि हाच आहे श्रीमंतीचा महामार्ग.

याचा अर्थ आपण व्यक्तिमत्व विकास म्हणजे वरकरणी कौशल्ये शिकायचे नाही असा नाही. कदाचित या सवयी तुमच्या अंगवळणी पडल्यानंतर तुम्हाला जगात इतर कोणतेही कौशल्ये शिकणे, आत्मसात करणे कदापि अशक्य नाही.

पाश्चात्य लेखक स्टेफन कव्ही यांनी लिहिलेल्या सर्वाधिक प्रभावशाली लोकांच्या सात सवयी या पुस्तकावर मुक्त भाष्य किंवा मराठी मध्ये सारांश असे देखील तुम्ही या लेखमाले कडे पाहु शकता.

seven habits of highly effective people marathi

या ज्या सात सवयी आहेत त्या तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये , सामाजिक जीवनामध्ये तसेच तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये अधिक प्रभावशाली व अनुषंगाने यशस्वी करतील.

यशस्वी होणे व श्रीमंत होणे यासाठी आपण जो मार्ग अवलंबणार आहोत तो, आधी सांगितल्या प्रमाणे शॉर्ट कट अजिबात नाही के लक्षात ठेवा. या जगामध्ये आपल्याकडे असलेले सर्वात महत्वाचे व जन्मतःच आपणास मिळालेले संसाधन, भांडवल म्हणजे आपण स्वतः होय. त्यामुळे हे संसाधन अधिक प्रभावशाली करणे हेच आपल्या यशाचे गुपित आहे.

हे सर्व अधिक चांगले व परिणामकार होण्यासाठी आपणास आपली मनोभुमिका या सर्व शिक्षणासाठी आधी अनुकूल करुन घ्यावी लागेल. व हे कसे करायचे हे आपण पुढील लेखामध्ये पाहुयात.

वाचीत रहा माझे लेख जे तुम्हाला श्रीमंतीच्या महामार्गावर दिशादर्शकाचे काम करतील.

समाजजीवनामध्ये

लेख आवडल्यास अवश्य तुमचा अभिप्राय कळवा, शेयर, फॉरवर्ड करा.

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वरलेख नोंदणीअसा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *